Type Here to Get Search Results !

भानापूर येथे भीषण तिहेरी अपघात : महिलेचा जागीच मृत्यू, दोन दुचाकीस्वार गंभीर* दुग्धव्यवसाया साठी निघालेल्या माय -लेका वर काळाचा घाला !




*सुलतानपूर, दि. ११ (प्रतिनिधी)* : छत्रपती संभाजीनगर–नागपूर राज्य महामार्गावर भानापूर परिसरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


*अपघात कसा घडला?*  

प्राप्त माहितीनुसार, हिवरा खंड येथील तसलीम रमजान परसुवाले (वय ३५) हे आपली आई बानुबाई रमजान परसुवाले (वय ५५) यांच्यासह दुचाकी क्र. MH 28 BM 490 ने दूध व्यवसायासाठी सुलतानपूरकडे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने सुलतानपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वडगाव तेजन येथील लक्ष्मण दामोधर मानवतकर (वय ३४) हे दुचाकी क्र. MH 28 CG 1350 ने जात होते.


भानापूर परिसरात या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बानुबाई रमजान परसुवाले या रस्त्यावर फेकल्या गेल्या.


प्राथमिक माहितीनुसार, बानुबाई रस्त्यावर फेकल्या असतामागून येणाऱ्या क्रेन क्र. MH 28 AZ 9144 चे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. क्रेन चालक शे. अरशद शे. सत्तार हे क्रेन चालवत होते. या भीषण धडकेत बानुबाई यांचा जागीच मृत्यू झाला.


*दोघे गंभीर जखमी, मेहकरला हलवले*  

अपघातात दुचाकीस्वार तसलीम परसुवाले व लक्ष्मण मानवतकर हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली .

मृत बानुबाई परसुवाले यांच्या पार्थिवाचे मेहकर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी हिवरा खंड येथील मूळ गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत. क्रेन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


दरम्यान, छत्रपती संभाजीनगर–नागपूर महामार्गावरील भानापूर परिसर अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. येथे वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक व सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments