Type Here to Get Search Results !

उष्माघाताचा बळी; येसापुर येथील सुनंदाबाई लंबे यांचे दुर्दैवी निधन !


 



वाढत्या तापमानाचा कहर; उपचारादरम्यान मृत्यू – परिसरात शोककळा  !

सुलतानपुर, दि. २ (प्रतिनिधी) :
येथुन जवळच असलेल्या  येसापुर येथील सौ. सुनंदा मदन लंबे (वय ५४) यांचे तीव्र उष्माघातामुळे दुर्दैवी निधन झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाढत्या उन्हाच्या झळांनी  एक बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास प्रचंड उकाड्यामुळे सुनंदाबाईंना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तीव्र स्वरूपाचा उष्माघाताचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सुलतानपुर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले, मात्र प्रकृती अधिकच गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पुढील उपचारासाठी त्यांना मेहकर व तदनंतर  जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

जालना येथील रुग्णालयात वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न केले. परंतु उष्माघाताचा परिणाम अतिशय तीव्र असल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दि. १ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने लंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुनंदाबाई या शांत, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावामुळे गावात परिचित होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने येसापुर गावात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व इतर नातेवाईक असा आप्त परिवार आहे. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

दरम्यान, सध्या परिसरात तापमानात मोठी वाढ होत असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे, डोके झाकून ठेवण्याचे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घेण्याचे तसेच वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उष्णतेचा वाढता कहर आता जीवघेणा ठरत असून, प्रशासनाने गावागावात जनजागृती मोहीम राबवून प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments