लोणार दि. ८ (प्रतिनीधी)
लोणार तालुक्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाच्या वतीने महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, तहसील कार्यालय लोणार यांच्या माध्यमातून “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश महसूल विभागाच्या विविध सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा जागेवर निपटारा करणे हा आहे.
हे शिबिर सुलतानपूर महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या सुलतानपूर, भानापूर, येसापूर, नरसापूर, बांडा , वडगांगाव तेजन, उदनापूर, तांदुळवाडी, पारडी तसेच लोणार प्र. लोणार वेणी भाग - १ मोहतखेड , मातरखेड , निजामपुर , वेणी भाग २ , बोरखेडी , पारडी प्र. मेहकर , कमळजापुर , गुंधा , पळसखेड , शहर
विविध प्रभागांसह परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या न मारता आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
शिबिरामध्ये फेरफार अदालती कामकाज, सातबारा दुरुस्ती, जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र वाटप, संजय गांधी व श्रावण बाळ योजना मंजुरी, नवीन रेशन कार्ड वाटप व दुरुस्ती, जमीन वर्ग परिवर्तन यांसारख्या महसूल विषयक कामांचा समावेश आहे. तसेच कृषी विभागाकडून विविध योजनांबाबत मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
याशिवाय, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान कार्ड वाटप, पोस्ट विभागाच्या योजनांची माहिती, पीएम किसान योजनेतील प्रलंबित हप्ते, शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, लक्ष्मी मुक्ति योजना, सल्लागार योजना अर्ज, लाडकी बहिण योजनेसाठी केवायसी तसेच आधार अपडेट सुविधा याही सेवा शिबिरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
हे शिबिर शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता श्री शिवाजी हायस्कूल, सुलतानपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी श्री. रविंद्र जोगी, तहसीलदार श्री. भुषण पाटील, नायब तहसीलदार श्रीमती योगेश्वरी परळीकर तसेच मंडळ अधिकारी श्री. संतोष पनाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments