लोणार | दि. ६ एप्रिल
राज्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज राज्यव्यापी आंदोलन छेडत लोणार तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सध्या गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून आर्थिक झळही बसत आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने परिस्थितीची तीव्रता अधोरेखित झाली आहे.
गॅस टंचाईमुळे छोटे व्यावसायिक, हॉटेल्स, लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, तसेच हॉस्टेलमधील मेस सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे जेवण बंद पडले असून रिक्षा भाड्यातही वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत.
११ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा आज प्रत्यक्षात उतरत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनादरम्यान
गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तातडीने थांबवावी ,
काळाबाजार रोखून दोषींवर कडक कारवाई करावी ,
गॅस वितरण नियमित करून विलंब टाळावा ,
विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे ,
परिस्थिती सामान्य होण्याचा कालावधी जाहीर करावा ,
केवायसीअभावी गॅस नाकारण्याची प्रक्रिया थांबवावी ,
उज्वला योजनेअंतर्गत झालेल्या वितरणाचे जिल्हानिहाय ऑडिट करावे आदि
मागण्यांचे निवेदन तहसीलदार लोणार यांना देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ राठोड, युवा तालुका अध्यक्ष गौतम गवई, युवा तालुका महासचिव पवन अवसरमोल, के. बी. इंगळे, शहराध्यक्ष महेंद्र मोरे यांच्यासह रतन मोरे, नितीन मोरे, राजेश लहाने, राहुल अंभोरे, सुरेश मोरे, विनोद अंभोरे, रुपेश मोरे, राजू जाधव, नारायण जगदाळे, किसन चव्हाण, मंगेश मोरे, शामराव घुले, पुंजाराम सोनुने, विलास लहाने, प्रताप भालेराव, उद्धव साठे, दीपक अंभोरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनामुळे प्रशासनाने तातडीने गॅस टंचाईचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Post a Comment
0 Comments