नांदुरा दि . १७
(प्रतिनिधी) :
नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा महसूल मंडळ परिसरात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम २०२५ मधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी अंबिका फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, ज्वारी, बाजरी, तूर, मक्का आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, सोयाबीनचे उत्पादन केवळ २ ते ३ क्विंटल प्रति एकर इतकेच राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
राज्य शासनाने काही प्रमाणात (६० टक्के) अनुदान जाहीर केले असले तरी, ते अपुरे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. याचबरोबर पिक विमा योजनेत ऑनलाइन प्रक्रियेमधील त्रुटी, तांत्रिक अडचणी व अटी-शर्तींचा शब्दशः वापर करून अनेक शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
अभय पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता १०० टक्के पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडतील.”
तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, “येणाऱ्या १० दिवसांत पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, तर पिक विमा कार्यालय ताब्यात घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
या मागणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
“अनुदान मिळाले, पण ते अपुरे आहे; विमा मिळालाच पाहिजे.” – स्थानिक शेतकरी
“ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेकांना लाभ मिळत नाही.” – शेतकरी प्रतिनिधी
“विमा कंपनीने तातडीने सर्व प्रकरणे निकाली काढावीत.” – ग्रामस्थ

Post a Comment
0 Comments