Type Here to Get Search Results !

सुलतानपुर कृषी साहित्य विक्रेत्यांचा बंद आंदोलन; विविध मागण्यांसाठी एकजूट !

 सुलतानपुर कृषी साहित्य विक्रेत्यांचा बंद आंदोलन; विविध मागण्यांसाठी एकजूट !


सुलतानपुर दि .२८ (प्रतिनिधी )

राज्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७ एप्रिल २०२६ पासून) बेमुदत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली असून सुलतानपुर येथील कृषी साहित्य विक्रेत्यांनीही या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद दिला आहे. यामुळे परिसरातील अनेक कृषी केंद्रे बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

माफदा, पुणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात बुलडाणा जिल्ह्यासह सुलतानपुरातील विक्रेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विक्रेत्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत आपली भूमिका ठामपणे मांडली.


रासायनिक खतांवरील डीलर मार्जिन वाढविणे व ‘लिंकिंग’ पद्धत बंद करून FOR पद्धतीने खत उपलब्ध करून देणे.


अनधिकृत एचटीबीटी (HTBT) बियाण्यांच्या विक्रीवर कठोर फौजदारी कारवाई करणे.

साठी अ‍ॅपद्वारे बियाणे व कीटकनाशक विक्रीसंबंधी नियम व्यवहार्य करणे.

नियमांनुसार व्यवहार करूनही विक्रेत्यांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे.

नवीन सीड अ‍ॅक्ट व कीटकनाशक कायद्यातील अन्यायकारक व जाचक नियम रद्द करणे.

विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून शासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या बंदमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने मध्यस्थी करून लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

"सुलतानपुरातील कृषी साहित्य विक्रेत्यांचा हा बंद आंदोलन राज्यातील व्यापक असंतोषाचे प्रतीक ठरत असून, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "

Post a Comment

0 Comments