लोणार दि. १७(प्रतिनिधी )
वझर आघाव परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वासराची शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वझर आघाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात गहू काढण्याचे काम मशीनद्वारे सुरू होते. याच दरम्यान शेतात वासरू मृत अवस्थेत आढळून आले. वासरू मारलेले असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता जवळच दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला.
बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी तत्काळ आरडाओरड केली. आवाज होताच बिबट्याने तेथून पळ काढत जवळील मक्याच्या शेतात जाऊन लपल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी व संतोष साळवे सरपंच यांनी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदु भाऊ मापारी यांना कळवीली त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.व लवकरात लवकर पोहचा असे सांगीतले
मात्र वृत्त लिहीपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी आणि बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे, असेही सांगण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments