Type Here to Get Search Results !

सुलतानपुर मध्ये लवकरच स्टेट बॅक ऑफ इंडिया ची शाखा येणार ; संजय लाहोटी यांच्या पाठपुराव्याला यश !

 सुलतानपुर मध्ये लवकरच स्टेट बॅक ऑफ इंडिया ची शाखा येणार ;

संजय लाहोटी यांच्या पाठपुराव्याला यश !


सुलतानपूर दि. २० (प्रतिनिधी) – सुलतानपूर व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली असून, लवकरच State Bank of India (SBI) ची नवीन शाखा सुलतानपूर येथे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे अध्यक्ष श्री. संजय  लाहोटी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे.


या संदर्भात श्री. संजय लाहोटी यांनी SBI चे मुख्य प्रबंधक नंदकुमार सिंह यांची भेट घेत सुलतानपूरमध्ये बँकेची शाखा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान परिसरातील लोकसंख्या, वाढती आर्थिक गरज, विद्यार्थ्यांची संख्या तसेच व्यापारी व शेतकरी वर्गाच्या अडचणी यांचा आढावा घेण्यात आला.


मुख्य प्रबंधक नंदकुमार सिंह यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, सुलतानपूरमध्ये SBI शाखा सुरू करण्याबाबत लवकरच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी बँकिंग सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


सध्या सुलतानपूर परिसरातील नागरिकांना बँकिंग कामकाजासाठी मेहकर व लोणार येथे जावे लागते. या प्रवासामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत होते. मात्र सुलतानपूरमध्येच SBI शाखा सुरू झाल्यास नागरिकांचा हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.


विशेष म्हणजे, डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ कॉलेजेसमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना फी भरणे, शिष्यवृत्ती व्यवहार, बँक खाते उघडणे अशा विविध आर्थिक कामांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय स्थानिक व्यापारी, स्वयं-सहायता बचत गट, शेतकरी यांनाही थेट बँकिंग सेवा मिळाल्याने आर्थिक व्यवहार अधिक गतिमान होणार आहेत.


सुलतानपूर परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे श्री. संजय लाहोटी यांचा पाठपुरावा निर्णायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

लवकरच सुलतानपूरमध्ये SBI शाखा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

Post a Comment

0 Comments