Type Here to Get Search Results !

सुलतानपुर येथे “विशाल हिंदू सम्मेलन” उत्साहात संपन्न सनातन संस्कृती रक्षणासाठी हिंदू समाज एकत्र यावे – युवाचार्य संत विवेक दास जी शास्त्री महाराज यांचे आवाहन !


सुलतानपुर,दि. १७ (प्रतिनीधी ) 

येथील श्री राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले “विशाल हिंदू सम्मेलन” ता .१५ ला उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला परिसरातील विविध गावांमधून हिंदू बांधव, मातृशक्ती आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात धर्मजागृतीचे वातावरण निर्माण झाले होते.


कार्यक्रमाची सुरुवात श्री राम मंदिरात पूजा-अर्चना व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या सम्मेलनाला युवाचार्य संत, आंतरराष्ट्रीय कथावाचक पूज्य विवेक दास जी शास्त्री महाराज (काशी, वाराणसी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सनातन हिंदू धर्माचे महत्त्व अधोरेखित करत हिंदू समाजाने एकत्र राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. हिंदू समाजाने जात-पात व भेदभाव विसरून धर्म, संस्कृती आणि राष्ट्ररक्षणासाठी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शेखरजी केळकर (प्रांत व्यवसायी कार्य प्रमुख) यांनी हिंदू समाजाच्या संघटनाबाबत मार्गदर्शन केले. समाजामध्ये समरसता, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक कुटुंबाने घरामध्ये संस्कारांची परंपरा जपून पुढील पिढीला भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.


या प्रसंगी महिला वक्त्या ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई बोबडे (कोयाळी दहातोंडे) यांनीही आपले विचार मांडले. समाज आणि संस्कृती जपण्याचे मोठे कार्य मातृशक्तीच्या हातात असून कुटुंबामध्ये संस्कार निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम महिलांनी करावे, असे त्यांनी सांगितले.

या विशाल हिंदू सम्मेलनामध्ये हिंदू समाजामध्ये एकता, धर्मजागृती आणि संस्कृती संरक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी “जय श्रीराम” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


कार्यक्रमाला सुलतानपुर तसेच परिसरातील येसापुर, भानापूर, पारडी सिरसाट, चिंचोली बोरे, वडगाव तेजन आणि बोरेखेडी येथील मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments