Type Here to Get Search Results !

डॉ. हेमराज लाहोटी यांच्या वतीने दावत-ए-इफ्तारचे आयोजन !

 


सुलतानपूर दि. ११ (प्रतिनिधी) – पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने समाजात सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सौहार्द वाढावे या उद्देशाने नेहमीच धार्मिक कार्यात अंग्रेसर असलेले डॉ. हेमराज  लाहोटी यांच्या वतीने भव्य दावत-ए-इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रमजान हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात रोजा पाळून संध्याकाळी इफ्तारच्या वेळी उपवास सोडण्याची परंपरा असून त्याच पार्श्वभूमीवर हा सामुदायिक इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमामध्ये परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रोजा-इफ्तारचा आनंद सामूहिकरीत्या साजरा करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. इफ्तारच्या माध्यमातून विविध समाजघटकांमधील आपुलकी, प्रेम आणि परस्पर समजूत वाढावी, तसेच समाजात एकात्मतेचा संदेश जावा हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.


डॉ. हेमराज लाहोटी हे सुलतानपूर परिसरात धार्मिक ,सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्यासाठी ओळखले जातात. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत असतात. समाजातील सर्व घटकांमध्ये ऐक्य आणि परस्पर आदर वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी यापूर्वीही अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याच परंपरेचा एक भाग म्हणून याहीवर्षी दावत-ए-इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रमजान महिन्यातील उपवास, प्रार्थना आणि दानधर्म या गोष्टींना इस्लाम धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात संयम, सहनशीलता आणि समाजातील गरजूंची मदत करण्याची भावना जोपासली जाते. अशा पवित्र वातावरणात सामूहिक इफ्तारचे आयोजन केल्याने समाजातील विविध धर्म व पंथातील लोकांमध्ये संवाद वाढतो आणि परस्पर स्नेह अधिक दृढ होतो, असे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध समाजघटकांतील मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व धर्मीय नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सामुदायिक इफ्तारच्या माध्यमातून “सर्व धर्म समभाव आणि सामाजिक सलोखा” याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही आयोजकांनी नमूद केले.


दरम्यान, सुलतानपूर परिसरातील मुस्लिम बांधवांनी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रमजान महिन्यात अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता, बंधुभाव आणि परस्पर आदराची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments