Type Here to Get Search Results !

सुलतानपुरातील राज्यमार्गावर खड्ड्यांचा सुळसुळाट ! प्रशासनाची डोळेझाक, वंचित चे महेंद्र पनाड यांचे खड्ड्यांची महाआरती करून उपरोधिक आंदोलन ! “अपघात झाल्यावरच जाग येणार का?” — संतप्त नागरिकांचा सवाल**


सुलतानपुर दि.१ (प्रतिनिधी )

येथील 

सुलतानपुर ते

डॉ. आर. एन. लाहोटी कॉलेज

 रोडवरील राज्यमार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, रस्त्यावर पडलेल्या भलेमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दुर्तफा रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचून अक्षरशः गटाराचे स्वरूप आले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.


या महत्त्वाच्या मार्गावर श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजसह विविध शैक्षणिक संस्था असून दररोज शेकडो रुग्ण, विद्यार्थी व नागरिकांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. याशिवाय वेदांत आश्रम व पशुपतीनाथ मंदिर यांसारखी धार्मिक स्थळे याच रस्त्यावर असल्याने भाविकांची व नागरीकांची ही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या या बिकट अवस्थेमुळे कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, 

पाऊसाळा नसतांना सुद्धा रोड वर पाणी येते कसे ? याचा बंदोबस्त न करता स्थानिक प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “कोणता तरी गंभीर अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थितांनी उपस्थित केला.


खड्ड्यांची महाआरती करून उपरोधिक आंदोलन !

या सर्व प्रकाराला वैतागून अखेर दि. २८ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांची पुष्प, दीप व धूपाने यथोचित पूजा करून महाआरती केली. “रस्त्यावरील खड्डे नाही तर देवस्थानच झाले आहे,” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


यावेळी बोलताना महेंद्र पनाड म्हणाले की, “जर तात्काळ खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात आला नाही, तर शेकडो नागरिकांना सोबत घेऊन हा मार्ग प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत अडवून धरला जाईल. याबाबतचे निवेदन लवकरच प्रशासनास दिले जाणार आहे.”


आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग !


या खड्डे पूजन महाआरती उपरोधिक आंदोलनात दिलीप पनाड (डी. के.), अशोक जावळे, राजेश गुलाबराव पनाड, सुरेश आश्रुजी मोरे, सिद्धार्थ पनाड, राहुल अवसरमोल, शालिकराम मुळे, प्रकाश चव्हाण, सतीष सुरुशे, सुशील आनंदराव, पंजाबराव लोखंडे, गजानन कटारे, सागर आत्माराम पनाड, जयराम सुरुशे, प्रवीण सरदार, सिद्धार्थ जावळे, राजरत्न पनाड, अनिल ढवळे, राजू जावळे, दौलतखा पठाण, भिकाजी पवार, सय्यद नाजीम भाई, शे. बाबूलाल यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .



बॉक्स : 

मित्राच्या मदतीने विद्यार्थ्याने गाठले परीक्षा केंद्र !



मागील आठवड्यात बारावीची परीक्षा देण्यासाठी बाहेरगावा वरुण येणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर याच खड्ड्यातून भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे गटाराचे घाण पाणी उडाल्याने त्या विद्यार्थाचे मानसिक खच्चीकरण झाले तो पुर्ता  गोधळून गेला  विद्यार्थ्याचे कपडे पूर्णपणे खराब झाल्याने तो घाबरला . मात्र गावातील एका मित्राने तात्काळ त्याला आपल्या घरी नेऊन नवीन कपड्यांची व्यवस्था केली. त्यामुळे हा विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला.

ही घटना म्हणजे या रस्त्यावरील धोक्याचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक सांगत आहेत.

एकूणच सुलतानपुर येथील या राज्यमार्गाची अवस्था अपघातास निमंत्रण देणारी असून, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास जनआक्रोश आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित रस्त्याचे दुरुस्ती काम हाती घेण्याची जोरदार मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments