सुलतानपूर | दि. १(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील वाशिम येथे दि . २८ ला आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात लोणार पंचायत समितीचे माजी उपसभापती, सुप्रसिद्ध अर्धांगवायू तज्ञ व शिवसेना नेते डॉ. हेमराज लाहोटी यांना प्रतिष्ठेचा ‘विदर्भभूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार केंद्रीय मंत्री व खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यभरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान सोहळ्यादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. लाहोटी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
❗जनसेवेस समर्पित सन्मान ❗
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. हेमराज लाहोटी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझ्या वैयक्तिक यशाचा नसून जनतेच्या सेवेला समर्पित आहे. सामाजिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रातील काम पुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याची ही प्रेरणा आहे.” त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी दाद दिली.
अर्धांगवायू उपचारात राज्यभरात
डॉ. लाहोटी हे नाव अर्धांगवायू (पॅरालिसिस) रुग्णांवरील खात्रीशीर व परिणामकारक उपचारांसाठी राज्यभरात परिचित आहेत.
अनेक गरजू रुग्णांना कमी खर्चात व संवेदनशीलतेने उपचार मिळावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आरोग्यसेवेबरोबरच धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, विविध समाजोपयोगी कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.
सुलतानपूरचा अभिमान !
सध्या त्यांच्या पत्नी सौ. किरणताई हेमराज लाहोटी या सुलतानपूर येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे लाहोटी कुटुंब सामाजिक, प्रशासकीय व सार्वजनिक जीवनात सक्रिय भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसते.
या सन्मानाबद्दल डॉ. हेमराज लाहोटी यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे सुलतानपूर व परिसराच्या नावलौकिकात भर पडली असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments