सुलतानपूर दि . ८ (प्रतिनिधी) : सुलतानपूर गावात शुक्रवारला ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन्नबी) मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. पैगंबर-ए-आझम हुजूर मोहम्मद मुस्तफा सलल्लाहो अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनी दरवर्षी ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. यानिमित्त सकाळी आठ वाजता भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली व अकरा वाजेपर्यंत आनंदमय वातावरणात ती संपन्न झाली.
मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनात शेख खाजा शे. उमर, शेख जिलानी शेख फारूक, लालमिया मुल्लाजी, गफ्फार शहा यांचे विशेष सहकार्य लाभले. तर मोहसीन मुल्लाजी, शेख अबरार शेख बशारत, हबीब खा पठाण यांनी मिळून मिरवणुकीची विशेष जबाबदारी पार पाडली.
या भव्य मिरवणुकीत तंजीम रजा-ए-मुस्तफा, नागवंशी सामाजिक संघटन, आजाद ग्रुप, विदर्भ कन्या शाहीन पटेल, अख्तर भाई मित्र मंडळ, गौसिया ग्रुप, चिस्तिया ग्रुप, भिमयोध्दा ग्रुप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनीही सहकार्य केले. तसेच सर्वांच्या वतीने फराळ,खाद्यपदार्थ, व पाणी वाटप करण्यात आले.
या दिवशी मुस्लिम बांधव मोहम्मद पैगंबर साहेबांच्या शिकवणीचे स्मरण करून समाजात बंधुता, शांती आणि एकतेचा संदेश देतात. सुलतानपूरमध्येही मिरवणुकीत "नारा-ए-तकबीर अल्लाहु अकबर" अशा घोषणा देत वातावरण दुमदुमून गेले. धार्मिक झेंडे, तालीम पथकांचे प्रात्यक्षिक, नात-ए-पाक पठण यामुळे मिरवणूक अधिकच आकर्षक ठरली.
मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अवचार साहेब, पोलीस निरीक्षक पवार साहेब,हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार, सुनील नागरे, पोलीस पाटील पती राजू भानापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीदरम्यान योग्य ती खबरदारी घेत शिस्त राखली.
संपूर्ण सुलतानपूर गावात धार्मिक सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग नोंदवला. मोहम्मद पैगंबरांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून गावात बंधुभाव, एकता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अधोरेखित झाला.
मिरवणुकीचा समारोप जामा मस्जिद येथे फातेहा खाणी व सलाम पठणाने झाला.

Post a Comment
0 Comments