लोणार दि . २९ प्रतिनिधी ( अनिल दहातोंडे )
ग्रामीण भागातील टपाल सेवांना अधिक बळकटी देण्यासाठी दि. २७ मार्च २०२६ रोजी बुलढाणा डाक विभागामार्फत कोयाळी दहातोंडे येथे नव्या शाखा डाकघरांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे कोयाळी गावाला नवी ओळख प्राप्त झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय डाक विभागाच्या वतीने ग्रामीण नागरिकांना टपाल, विमा व विविध वित्तीय सेवा सुलभ व्हाव्यात या उद्देशाने लोणार उपडाकघर अंतर्गत कोयाळी शाखा डाकघर कार्यान्वित करण्यात आले. या शाखेचा शुभारंभ बुलढाणा विभागाचे डाक अधीक्षक मा. गणेश अंभोरे यांच्या हस्ते पार पडला. डाक निरीक्षक गजानन काळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे साकार झाला.
उद्घाटन प्रसंगी शाखा डाकघराची आकर्षक सजावट फुगे व रिबीनने करण्यात आली होती. नव्याने सुरू झालेल्या या शाखेत नागरिकांना बाल आधार नोंदणी सेवा, सुकन्या समृद्धी खाते, बचत खाते तसेच थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निरंजन शुक्ल यांनी केले. यावेळी लोणार उपडाकपाल बद्रीनाथ पालवे, डाक सहाय्यक ज्ञानेश्वर टाले, मेहकर डाक निरीक्षक कार्यालयाचे सहाय्यक देवानंद आकाळ तसेच संबंधित BPM व ABPM उपस्थित होते. कार्यक्रमाला सरपंच, पोलीस पाटील भागवत दहातोंडे, तंटामुक्ती अध्यक्ष रतन दहातोंडे, ग्रामसेवक गवई, संजय दहातोंडे, महादेव त्र्यंबके, अनिल दहातोंडे, सुनिल दहातोंडे, शिवनारायण गणगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी POSB ची तब्बल १५१ खाती उघडण्यात आली. यावरून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
या शाखेमुळे गावकऱ्यांना आता विविध सेवांसाठी शहरात जाण्याची गरज कमी होणार असून वेळ व खर्चाची मोठी बचत होणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मा. गणेश अंभोरे यांनी नागरिकांना या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments