Type Here to Get Search Results !

खेड्या–गल्लीत घडलेले समाजकार्य… दिल्लीत गाजले ! “अण्णा मुळेंचा दिल्लीत डंका”**

 **खेड्या–गल्लीत घडलेले समाजकार्य… दिल्लीत गाजले !


“अण्णा मुळेंचा दिल्लीत डंका”** !

लोणार  प्रतिनिधी दि. ५ 

लोणार तालुक्यातील उदनापूर या छोट्याशा खेड्यातून समाजकारणाची मशाल हाती घेऊन अविरत कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांच्या कार्याची दखल थेट देशाची राजधानी दिल्ली येथे घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न, जनजागृती व सेवाभावी उपक्रमांमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला असून, या सन्मानामुळे संपूर्ण बुलडाणा जिल्हा व लोणार तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.


माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतकोत्तर जन्मजयंतीनिमित्त दिल्ली येथे आयोजित विशेष राष्ट्रीय कार्यक्रमात रमेश अण्णा मुळे यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम स्वर्गीय श्रीकांत शंकर जोशी (माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांच्या पावन स्मरणार्थ मदरलंँड इंटरनॅशनल फाउंडेशन व मुस्लिम राष्ट्रीय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

“पंच परिवर्तन – श्रेष्ठ भारत, विकसित भारत” या विषयावर संगोष्ठी, चित्रफीत लोकार्पण व वादन समारंभ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. सदर कार्यक्रम ३ जानेवारी रोजी पार पडला.


या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार होते.


यावेळी उदनापूर (ता. लोणार) येथील ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी केलेल्या निःस्वार्थ व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नांवर जनजागृती, दुर्बल घटकांसाठी मदतीचे उपक्रम, सेवाभावी कार्य व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मुळे यांनी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


या प्रसंगी मदरलंँड इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. ए. के. अग्रवाल, राष्ट्रीय अल्पसंख्यक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ. शाहीद अख्तर, मोनिका कलहर भारद्वाज, सुरेश चव्हाणके, डॉ. श्रीराम जोशी, राजकुमार शर्मा, आनंद रेखी, राजेश यादव, सुभाष लोखंडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


दिल्लीसारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर लोणार तालुक्यातील एका ग्रामीण समाजसेवकाचा झालेला हा गौरव “खेड्यातून देशपातळीपर्यंत पोहोचलेले समाजकार्य” याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या सन्मानामुळे बुलडाणा जिल्ह्यासह लोणार तालुक्यातील सामाजिक क्षेत्राचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर अधिक उजळून निघाला आहे.

रमेश अण्णा मुळे यांच्या या यशाबद्दल जिल्ह्याभरातून तसेच लोणार तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक युवक सामाजिक कार्याकडे वळत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे !

Post a Comment

0 Comments