युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल: डॉ. आर. एन. लाहोटी इन्स्टिट्यूटमध्ये करिअर आणि व्यसनमुक्तीवर प्रभावी मार्गदर्शन !
उपविपोअ संतोष खाडे यांणी मांडले प्रेरणादायी वास्तव !
सुलतानपूर दि. १६ (प्रतिनिधी )
करिअर निवड आणि व्यसनमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर युवकांना योग्य दिशा मिळावी यासाठी डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये दिनांक १४ ऑक्टोबर रोजी एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य अतुल पडघान यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या सत्राला मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर आपल्या प्रभावी भाषणात संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे महत्त्व समजावून सांगितले. "करिअरची निवड ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. मोठे लक्ष्य ठेवा, सातत्यपूर्ण अभ्यास करा आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास यश निश्चित आहे," असे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षांची तयारी, वेळ व्यवस्थापन आणि जीवनात शिस्त असणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी जोर दिला.
यानंतर बोलताना पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. "व्यसन हे करिअर आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही नष्ट करणारे आहे. स्वतःपासून सुरुवात करून व्यसनमुक्त समाज घडवणे हीच खरी जबाबदारी आहे," असे प्रेरणादायी प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे पाहुण्यांकडून अधिक मार्गदर्शन मिळवले आणि कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरलेले हे सत्र संस्थेच्या उपक्रमशीलतेचे द्योतक ठरले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय लाहोटी, सचिव सोमेशभाऊ लाहोटी, प्राचार्य अतुल पडघान, प्राचार्य डॉ. नंदू कायंदे, प्राचार्य शिवाजी सुरूशे, प्राचार्य डॉ. राजेश वाठोरे, प्राचार्य डॉ. मीनल राऊत, प्राचार्य भावना जाधव यांच्यासह संस्थेतील अनेक मान्यवर तसेच पत्रकार सागर पनाड, मारोतराव सुरुशे, ग्रामपंचायत सदस्य शिवराज निलक, सागर जोशी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष काळे यांनी केले तर नितीन लोढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment
0 Comments